feet

योहानाचे शुभवर्तमान

एक सत्य कथा



प्रस्तावना

1प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. 2तोच प्रारंभी देवासह होता. 3सर्वकाही त्याच्या द्वारे झाले1 आणि जे काही झाले ते त्याच्यावाचून झाले नाही. 4त्याच्या ठायी जीवन होते, व ते जीवन मनुष्यमात्राचा प्रकाश होते. 5तो प्रकाश अंधारात प्रकाशतो; तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. 6देवाने पाठवलेला एक मनुष्य प्रकट झाला; त्याचे नाव योहान. 7तो साक्षीकरता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला; ह्यासाठी की, त्याच्या द्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा. 8हा तो प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला. 9जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता. 10तो जगात होता व जग त्याच्या द्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. 11जे त्याचे स्वतःचे2 त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. 12परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणार्‍यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला; 13त्यांचा जन्म रक्त, अथवा देहाची इच्छा, अथवा मनुष्याची इच्छा ह्यांपासून झाला नाही; तर देवापासून झाला. 14शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली, आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला. तो पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचा गौरव असावा असा अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होता. 15त्याच्याविषयी योहान साक्ष देतो आणि मोठ्याने म्हणतो : “‘जो माझ्यामागून येतो तो माझ्यापुढे झाला आहे, कारण तो माझ्यापूर्वी होता,’ असे ज्याच्याविषयी मी सांगितले तो हाच आहे.” 16त्याच्या पूर्णतेतून आपणा सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे. 17कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते; कृपा व सत्य हे येशू ख्रिस्ताच्या द्वारे आले. 18देवाला कोणीही कधीच पाहिले नाही; जो एकुलता एक जन्मलेला पुत्र देवपित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रकट केले आहे.




मंदिराचे शुद्धीकरण

13मग यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला व येशू वर यरुशलेमेस गेला. 14आणि मंदिरात गुरे, मेंढरे, कबुतरे विकणारे आणि सराफ हे बसलेले त्याला आढळले. 15तेव्हा त्याने दोर्‍यांचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे ह्या सर्वांना मंदिरातून घालवून दिले. सराफांचा खुर्दाही ओतून टाकला व चौरंग पालथे केले. 16आणि तो कबुतरे विकणार्‍यांना म्हणाला, “ही येथून काढून घ्या; माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका.” 17तेव्हा ‘तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकील,’ असा शास्त्रलेख असल्याचे त्याच्या शिष्यांना आठवले. 18त्यावरून यहूदी त्याला म्हणाले, “तुम्ही हे करता तर आम्हांला तुमच्या अधिकाराचे काय चिन्ह दाखवता?” 19येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी तीन दिवसांत ते उभारीन.” 20ह्यावरून यहूदी म्हणाले, “हे मंदिर बांधण्यास सेहेचाळीस वर्षे लागली आणि तुम्ही हे तीन दिवसांत उभारणार काय?” 21तो तर आपल्या शरीररूपी मंदिराविषयी बोलला होता. 22म्हणून तो असे म्हणत असे हे तो मेलेल्यांतून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले, आणि त्यांनी शास्त्रावर व येशूने जे वचन सांगितले होते त्यावर विश्वास ठेवला. 23वल्हांडणाच्या सणात यरुशलेम येथे असताना जी चिन्हे तो करत होता ती पाहून पुष्कळांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला. 24पण येशू सर्वांना ओळखून असल्यामुळे त्याला स्वतःला त्यांचा भरवसा नव्हता; 25शिवाय, मनुष्याविषयी कोणीही साक्ष द्यावी ह्याची त्याला गरज नव्हती, कारण मनुष्यात काय आहे हे त्याला स्वतःला ठाऊक होते.



निकदेमाबरोबर संभाषण

1परूश्यांपैकी निकदेम नावाचा एक मनुष्य होता; तो यहूद्यांचा एक अधिकारी होता. 2तो रात्रीचा येशूकडे येऊन त्याला म्हणाला, “गुरूजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात, हे आम्हांला ठाऊक आहे; कारण ही जी चिन्हे आपण करता ती देव बरोबर असल्यावाचून कोणालाही करता येत नाहीत.” 3येशू त्याला म्हणाला, “मी तुम्हांला खचीत सांगतो, नव्याने जन्मल्यावाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही.” 4निकदेम त्याला म्हणाला, “म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्याला मातेच्या उदरात दुसर्‍यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय?” 5येशूने उत्तर दिले की, “मी तुम्हांला खचीत सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. 6देहापासून जन्मलेले देह आहेत आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहेत. 7‘तुम्हांला नव्याने जन्मले पाहिजे’ असे मी तुम्हांला सांगितले म्हणून आश्‍चर्य मानू नका. 8वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तरी तो कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हांला कळत नाही; जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे.” 9निकदेम त्याला म्हणाला, “ह्या गोष्टी कशा होऊ शकतील?” 10येशूने त्याला उत्तर दिले, “तुम्ही इस्राएलाचे गुरू असूनही तुम्हांला ह्या गोष्टी समजत नाहीत काय? 11मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो की, जे आम्हांला ठाऊक आहे ते आम्ही सांगतो, आणि आम्ही पाहिले आहे त्याविषयी साक्ष देतो; पण तुम्ही आमची साक्ष मानत नाही. 12मी पृथ्वीवरील गोष्टी तुम्हांला सांगितल्या असता तुम्ही विश्वास धरत नाही तर स्वर्गातल्या गोष्टी तुम्हांला सांगितल्यास विश्वास कसा धराल? 13स्वर्गातून उतरलेला [व स्वर्गात असलेला] जो मनुष्याचा पुत्र त्याच्यावाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. 14जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे; 15ह्यासाठी की, जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.1 16देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. 17देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्या द्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. 18जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्याय-निवाड्याचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला आहे; कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. 19निवाडा हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली; कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती. 20कारण जो कोणी वाईट कृत्ये करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही. 21परंतु जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो ह्यासाठी की, आपली कृत्ये देवाच्या ठायी केलेली आहेत हे उघड व्हावे.”



येशू व शोमरोनी स्त्री

1येशू योहानापेक्षा अधिक शिष्य करून त्यांचा बाप्तिस्मा करत आहे हे परूश्यांच्या कानी गेले आहे असे जेव्हा प्रभूला कळले, 2(तरी येशू स्वतः बाप्तिस्मा करत नसे, तर त्याचे शिष्य करत असत), 3तेव्हा तो यहूदीया सोडून पुन्हा गालीलात गेला; 4आणि त्याला शोमरोनामधून जावे लागले. 5मग तो शोमरोनामधून सूखार नावाच्या नगरास आला; ते याकोबाने आपला मुलगा योसेफ ह्याला दिलेल्या शेताजवळ होते. 6तेथे याकोबाचा झरा होता. चालून चालून दमलेला येशू तसाच त्या झर्‍यावर बसला; तेव्हा सुमारे सहावा तास होता. 7तेथे शोमरोनाची एक स्त्री पाणी काढण्यास आली. तिला येशू म्हणाला, “मला प्यायला पाणी दे.” 8कारण त्याचे शिष्य अन्न विकत घ्यायला नगरात गेले होते. 9तेव्हा ती शोमरोनी स्त्री त्याला म्हणाली, “आपण यहूदी असता माझ्यासारख्या शोमरोनी स्त्रीजवळ प्यायला पाणी मागता हे कसे?” कारण यहूदी शोमरोनी लोकांबरोबर संबंध ठेवत नसतात. 10येशूने तिला उत्तर दिले, “देवाचे दान म्हणजे काय आणि ‘मला प्यायला पाणी दे,’ असे तुला म्हणणारा कोण आहे, हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असतेस आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते.” 11ती त्याला म्हणाली, “महाराज, पाणी काढायला आपल्याजवळ पोहरा नाही व विहीर तर खोल आहे, मग ते जिवंत पाणी आपल्याजवळ कोठून? 12आमचा पूर्वज याकोब ह्याने ही विहीर आम्हांला दिली; तो स्वतः, त्याचे मुलगे व त्याची गुरेढोरे हिचे पाणी पीत असत. त्याच्यापेक्षा आपण मोठे आहात काय?” 13येशूने तिला उत्तर दिले, “जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल, 14परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही; जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल.” 15ती स्त्री त्याला म्हणाली, “महाराज, मला तहान लागू नये व पाणी काढायला मला येथवर येणे भाग पडू नये म्हणून ते पाणी मला द्या.” 16तो तिला म्हणाला, “तू जाऊन आपल्या नवर्‍याला बोलावून आण.” 17ती स्त्री म्हणाली, “मला नवरा नाही.” येशूने तिला म्हटले, “मला नवरा नाही हे ठीक बोललीस, 18कारण तुला पाच नवरे होते आणि आता जो तुझ्याबरोबर आहे तो तुझा नवरा नाही, हे तू खरे सांगितलेस.” 19ती स्त्री त्याला म्हणाली, “महाराज, आपण संदेष्टे आहात हे आता मला समजले. 20आमच्या पूर्वजांनी ह्याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता, जेथे उपासना केली पाहिजे ते स्थान यरुशलेमेत आहे.” 21येशू तिला म्हणाला, “बाई, तुम्ही पित्याची उपासना ह्या डोंगरावर व यरुशलेमेतही करणार नाही अशी वेळ येत आहे, हे माझे खरे मान. 22तुम्हांला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता; आम्हांला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो; कारण यहूद्यांतूनच तारण आहे. 23तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे; किंबहुना आलीच आहे; कारण असे आपले उपासक असावेत अशीच पित्याची इच्छा आहे. 24देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.” 25ती स्त्री त्याला म्हणाली, “मशीहा, ज्याला ख्रिस्त म्हणतात, तो येणार आहे हे मला ठाऊक आहे; तो आल्यावर आम्हांला सर्व गोष्टी सांगेल.” 26येशू तिला म्हणाला, “जो तुझ्याबरोबर बोलत आहे तो मी तोच आहे.” 27इतक्यात त्याचे शिष्य आले आणि तो एका स्त्रीबरोबर बोलत आहे ह्याचे त्यांना आश्‍चर्य वाटले; तरी “आपण काय विचारत आहात” किंवा “आपण तिच्याबरोबर का बोलत आहात” असे कोणी म्हटले नाही. 28ती स्त्री तर आपली घागर तेथेच टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाली, 29“चला, मी केलेले सर्वकाही ज्याने मला सांगितले, तो मनुष्य पाहा; तोच ख्रिस्त असेल काय?” 30तेव्हा ते नगरातून निघून त्याच्याकडे येऊ लागले. 31शिष्य त्याला विनंती करू लागले की, “गुरूजी, जेवा.” 32परंतु तो त्यांना म्हणाला, “तुम्हांला ठाऊक नाही असे अन्न माझ्याजवळ खायला आहे.” 33ह्यावरून शिष्य एकमेकांना म्हणू लागले, “ह्याला कोणी खायला आणले असेल काय?” 34येशू त्यांना म्हणाला, “ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्न आहे. 35‘अजून चार महिन्यांचा अवकाश आहे, मग कापणी येईल’ असे तुम्ही म्हणता की नाही? पाहा, मी तुम्हांला म्हणतो, आपली नजर वर करून शेते पाहा; ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत. 36कापणारा मजुरी मिळवतो व सार्वकालिक जीवनासाठी पीक एकत्र करतो; ह्यासाठी की, पेरणार्‍याने व कापणी करणार्‍यानेही एकत्र आनंद करावा. 37‘एक पेरतो व एक कापतो,’ अशी जी म्हण आहे ती ह्या बाबतीत खरी आहे. 38ज्यासाठी तुम्ही श्रम केले नव्हते ते कापायला मी तुम्हांला पाठवले; दुसर्‍यांनी श्रम केले होते व तुम्ही त्यांच्या श्रमांचे वाटेकरी झाला आहात.” 39“मी केलेले सर्वकाही त्याने मला सांगितले” अशी साक्ष देणार्‍या त्या स्त्रीच्या बोलण्यावरून त्या नगरातील पुष्कळ शोमरोनी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. 40म्हणून शोमरोनी त्याच्याकडे आल्यावर त्यांनी त्याला आपल्या येथे राहण्याची विनंती केली; मग तो तेथे दोन दिवस राहिला. 41त्याच्या वचनावरून आणखी कितीतरी लोकांनी विश्वास धरला. 42आणि ते त्या स्त्रीला म्हणाले, “आता तुझ्या बोलण्यावरूनच आम्ही विश्वास धरतो असे नाही, कारण आम्ही स्वतः ऐकले आहे व हा खचीत ख्रिस्त, जगाचा तारणारा आहे हे आम्हांला कळले आहे.”



स्वर्गीय पित्यावर येशू कसा अवलंबून राहतो ह्याचा त्याने केलेला खुलासा

19ह्यावरून येशूने त्यांना उत्तर दिले : मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो त्यावाचून त्याला स्वतः होऊन काहीही करता येत नाही; कारण जे काही तो करतो ते पुत्रही तसेच करतो. 20कारण पिता पुत्रावर प्रीती करतो आणि स्वतः जे काही करतो ते सर्व त्याला दाखवतो. तुम्हांला आश्‍चर्य वाटावे म्हणून तो ह्यांहून मोठी कामे त्याला दाखवील. 21कारण जसा पिता मेलेल्यांना उठवून जिवंत करतो तसा पुत्रही पाहिजे त्यांना जिवंत करतो. 22पिता कोणाचाही न्याय करत नाही, तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपवून दिले आहे; 23ह्यासाठी की, जसा पित्याचा सन्मान करतात तसा पुत्राचाही सन्मान सर्वांनी करावा. जो पुत्राचा सन्मान करत नाही तो, ज्याने मला पाठवले, त्या पित्याचा सन्मान करत नाही. 24मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही, तो मरणातून जीवनात पार गेला आहे. 25मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो की, मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील, अशी वेळ येत आहे, किंबहुना आता आलीच आहे. 26कारण पित्याच्या ठायी जसे स्वतःचे जीवन आहे तसे पुत्राच्या ठायीही स्वत:चे जीवन असावे असे त्याने त्याला दिले; 27आणि तो मनुष्याचा पुत्र आहे, ह्या कारणास्तव न्यायनिवाडा करण्याचा अधिकारही त्याला दिला. 28,29ह्याविषयी आश्‍चर्य करू नका; कारण कबरांतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.



जीवनाची भाकर

22दुसर्‍या दिवशी जो लोकसमुदाय समुद्राच्या पलीकडे उभा होता त्याने पाहिले की, ज्या लहान मचव्यात त्याचे शिष्य बसले होते त्याच्याशिवाय तेथे दुसरा मचवा नव्हता, आणि येशू आपल्या शिष्यांबरोबर त्या मचव्यावर चढला नव्हता, तर त्याचे शिष्य मात्र निघून गेले होते. 23तरी जेथे प्रभूने आभार मानल्यावर त्यांनी भाकर खाल्ली होती त्या ठिकाणाजवळ तिबिर्याहून दुसरे लहान मचवे आले होते. 24तेथे येशू नाही व त्याचे शिष्यही नाहीत असे लोकसमुदायाने पाहिले तेव्हा ते लहान मचव्यांत बसून येशूचा शोध करत कफर्णहूमास आले. 25तेव्हा तो त्यांना समुद्राच्या पलीकडे भेटल्यावर ते त्याला म्हणाले, “गुरूजी, येथे कधी आलात?” 26येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, तुम्ही चिन्हे पाहिलीत म्हणून नव्हे तर भाकरी खाऊन तृप्त झालात म्हणून माझा शोध करता. 27नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका; तर पिता जो देव ह्याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हांला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल त्यासाठी श्रम करा.” 28ह्यावरून ते त्याला म्हणाले, “देवाची कामे आमच्या हातून व्हावीत म्हणून आम्ही काय करावे?” 29येशूने त्यांना उत्तर दिले, “देवाचे काम हेच आहे की, ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा.” 30ह्यावरून ते त्याला म्हणाले, “असे कोणते चिन्ह आपण दाखवता की जे पाहून आम्ही आपणावर विश्वास ठेवावा? आपण कोणते कृत्य करता? 31आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला; असे लिहिले आहे की, ‘त्याने त्यांना स्वर्गातून भाकर खाण्यास दिली.” 32ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, मोशेने तुम्हांला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही; तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हांला देतो. 33कारण जो स्वर्गातून उतरतो व जगाला जीवन देतो तोच देवाची भाकर होय.” 34म्हणून ते त्याला म्हणाले, “प्रभूजी, ही भाकर आम्हांला नित्य द्या.” 35येशू त्यांना म्हणाला, “मीच जीवनाची भाकर आहे; जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. 36परंतु तुम्ही मला पाहिले असताही विश्वास ठेवत नाही असे मी तुम्हांला सांगितले. 37पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही. 38कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे; 39आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे की, त्याने जे सर्व मला दिले आहे त्यांतून मी काहीही हरवू नये, तर शेवटल्या दिवशी मी ते उठवावे. 40माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की, जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे; त्याला मीच शेवटल्या दिवशी उठवीन.” 41‘मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे,’ असे तो म्हणाला म्हणून यहूदी त्याच्याविषयी कुरकुर करू लागले. 42ते म्हणाले, “ज्याचे आईबाप आपल्याला ठाऊक आहेत तोच हा योसेफाचा पुत्र येशू आहे ना? तर मग, ‘मी स्वर्गातून उतरलो आहे’ असे आता तो कसे म्हणतो?” 43येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही आपसांत कुरकुर करू नका. 44ज्याने मला पाठवले त्या पित्याने आकर्षित केल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही; त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन. 45संदेष्ट्यांच्या ग्रंथांत लिहिले आहे की, ‘ते सर्व देवाने शिकवलेले असे होतील.’ जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो. 46पित्याला कोणी पाहिले आहे असे नाही; जो देवापासून आहे त्याने मात्र पित्याला पाहिले आहे. 47मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. 48मीच जीवनाची भाकर आहे. 49तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला तरी ते मेले. 50स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. 51स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे; ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल; जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.” 52तेव्हा यहूदी आपसांमध्ये वितंडवाद करू लागले व म्हणाले, “हा आपला देह आम्हांला खायला कसा देऊ शकतो?” 53ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुमच्यामध्ये जीवन नाही; 54जो माझा देह खातो व माझे रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. 55कारण माझा देह खरे खाद्य व माझे रक्त खरे पेय आहे. 56जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो. 57जसे जिवंत पित्याने मला पाठवले आणि जसा पित्यामुळे मी जगतो, तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल. 58स्वर्गातून उतरलेली भाकर हीच होय; तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मेले. हे तसे नाही; ही भाकर जो खातो तो सर्वकाळ जगेल.” 59कफर्णहूमात शिक्षण देत असताना त्याने सभास्थानात ह्या गोष्टी सांगितल्या.



जगाचा प्रकाश

12पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.” 13ह्यावरून परूशी त्याला म्हणाले, “तुम्ही स्वतःविषयी साक्ष देता, तुमची साक्ष खरी नाही.” 14येशूने त्यांना उत्तर दिले, “मी स्वतःविषयी साक्ष दिली, तरी माझी साक्ष खरी आहे; कारण मी कोठून आलो व कोठे जातो हे मला ठाऊक आहे; मी कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हांला ठाऊक नाही. 15तुम्ही देहबुद्धीने न्याय करता; मी कोणाचा न्याय करत नाही. 16आणि जरी मी कोणाचा न्याय केला तरी माझा न्याय खरा आहे; कारण मी एकटा नाही तर मी आहे व ज्याने मला पाठवले तोही आहे. 17तुमच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की, दोघा मनुष्यांची साक्ष खरी आहे. 18मी स्वतःविषयी साक्ष देणारा आहे आणि ज्या पित्याने मला पाठवले तोही माझ्याविषयी साक्ष देतो.” 19ह्यावरून ते त्याला म्हणाले, “तुमचा पिता कोठे आहे?” येशूने उत्तर दिले, “तुम्ही मला किंवा माझ्या पित्यालाही ओळखत नाही; तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते.” 20तो मंदिरात शिकवत असता ही वचने जामदारखान्यात बोलला; तरी त्याला कोणी धरले नाही, कारण तोपर्यंत त्याची वेळ आली नव्हती.



जन्मांधाला दृष्टी देणे

1तो तिकडून जात असता एक जन्मांध माणूस त्याच्या दृष्टीस पडला. 2तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, “गुरूजी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला? ह्याच्या किंवा ह्याच्या आईबापांच्या?” 3येशूने उत्तर दिले, “ह्याने किंवा ह्याच्या आईबापांनी पाप केले असे नाही, तर ह्याच्या ठायी देवाची कार्ये प्रकट व्हावीत म्हणून हा असा जन्मास आला. 4ज्याने मला पाठवले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला2 केली पाहिजेत; रात्र येणार आहे, तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही. 5मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे.” 6असे बोलून तो भूमीवर थुंकला, थुंकीने त्याने चिखल केला; आणि तो चिखल त्या आंधळ्याच्या डोळ्यांना लावला, 7आणि त्याला म्हटले, “जा; शिलोह (म्हणजे पाठवलेला) नावाच्या तळ्यात धू.” मग त्याने जाऊन धुतले व तो डोळस होऊन आला. 8ह्यावरून शेजारीपाजारी व ज्यांनी त्याला पूर्वी भिक्षा मागताना पाहिले होते ते म्हणाले, “भीक मागत बसणारा तो हाच नाही काय?” 9कित्येक म्हणाले, “तोच हा.” दुसरे म्हणाले, “नाही, हा त्याच्यासारखा आहे;” तो म्हणाला, “मी तोच आहे.” 10ह्यावरून ते त्याला म्हणाले, “तुझे डोळे कसे उघडले?” 11त्याने उत्तर दिले, “येशू नावाच्या मनुष्याने चिखल करून माझ्या डोळ्यांना लावला आणि मला सांगितले, ‘शिलोह तळ्यावर जाऊन धू.’ मी जाऊन धुतले आणि मला दृष्टी आली.” 12तेव्हा त्यांनी त्याला म्हटले, “तो कोठे आहे?” तो म्हणाला, “मला ठाऊक नाही.”



उत्तम मेंढपाळ

7म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो की, मी मेंढरांचे दार आहे. 8जे माझ्यापूर्वी आले ते सर्व चोर व लुटारू आहेत; त्यांचे मेंढरांनी ऐकले नाही. 9मी दार आहे. माझ्या द्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारणप्राप्ती होईल; तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खाण्यास मिळेल. 10चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो; मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. 11मीच उत्तम मेंढपाळ आहे; उत्तम मेंढपाळ मेंढरांकरता आपला प्राण देतो. 12जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे, ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत तो लांडगा येत असलेला पाहून मेंढरे सोडून पळून जातो आणि लांडगा त्यांच्यावर झडप घालून त्यांची दाणादाण करतो. 13मोलकरी पळून जातो कारण तो मोलकरीच आहे आणि त्याला मेंढरांची काळजी नाही. 14,15मी उत्तम मेंढपाळ आहे; जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात; आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो. 16ह्या मेंढवाड्यातली नाहीत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजेत; ती माझी वाणी ऐकतील; मग एक कळप, एक मेंढपाळ असे होईल. 17मी आपला प्राण परत घेण्याकरता देतो म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो. 18कोणी तो माझ्यापासून घेत नाही, तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे.” 19ह्या शब्दांवरून यहूद्यांत पुन्हा फूट पडली. 20त्यांच्यातील पुष्कळ जण म्हणाले, “त्याला भूत लागले आहे व तो वेडा आहे; त्याचे तुम्ही का ऐकता?” 21दुसरे म्हणाले, “ही वचने भूतग्रस्ताची नाहीत; भुताला आंधळ्याचे डोळे उघडता येतात काय?”



हेल्लेण्यांची विनंती

20सणात उपासना करण्यास आलेल्या लोकांपैकी काही हेल्लेणी होते. 21त्यांनी गालीलातील बेथसैदाकर फिलिप्प ह्याच्याजवळ येऊन विनंती केली की, “महाराज, येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे.” 22फिलिप्पाने येऊन अंद्रियाला सांगितले; आणि अंद्रिया व फिलिप्प ह्यांनी येऊन येशूला सांगितले. 23येशूने त्यांना म्हटले, “मनुष्याच्या पुत्राचा गौरव होण्याची वेळ आली आहे. 24मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. 25जो आपल्या जिवावर प्रीती करतो तो त्याला मुकेल, आणि जो ह्या जगात आपल्या जिवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील. 26जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल; जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करील.



प्रीतीविषयी नवी आज्ञा

31तो बाहेर गेल्यावर येशूने म्हटले, “आता मनुष्याच्या पुत्राचा गौरव झाला आहे आणि त्याच्या ठायी देवाचा गौरव झाला आहे; 32देव आपल्या ठायी त्याचा गौरव करील; तो त्याचा लवकर गौरव करील. 33मुलांनो, मी अजून थोडा वेळ तुमच्याबरोबर आहे. तुम्ही माझा शोध कराल; आणि जसे मी यहूद्यांना सांगितले की, ‘जेथे मी जातो तेथे तुम्हांला येता येणार नाही,’ तसे तुम्हांलाही आता सांगतो. 34मी तुम्हांला नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी; जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. 35तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहात.”



पित्याकडे जाण्याचा मार्ग

1“तुमचे अंत:करण अस्वस्थ होऊ नये; देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. 2माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत; नसत्या तर मी तुम्हांला तसे सांगितले असते; मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. 3आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हांला आपल्याजवळ घेईन; ह्यासाठी की, जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. 4मी जातो तिकडचा मार्ग तुम्हांला ठाऊक आहे.” 5थोमा त्याला म्हणाला, “प्रभूजी, आपण कोठे जाता हे आम्हांला ठाऊक नाही; मग मार्ग आम्हांला कसा ठाऊक असणार?” 6येशूने त्याला म्हटले, “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्या द्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही. 7मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते; आतापासून तुम्ही त्याला ओळखता व तुम्ही त्याला पाहिलेही आहे.” 8फिलिप्प त्याला म्हणाला, “प्रभूजी, आम्हांला पिता दाखवा म्हणजे आम्हांला पुरे आहे.” 9येशूने त्याला म्हटले : “फिलिप्पा, मी इतका काळ तुमच्याजवळ असूनही तू मला ओळखत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे; तर ‘आम्हांला पिता दाखवा’ असे तू कसे म्हणतोस? 10मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे असा विश्वास तू धरत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगतो त्या मी आपल्या मनाच्या सांगत नाही; माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्ये करतो. 11मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे हे माझे तुम्ही खरे माना; नाहीतर माझ्या कृत्यांमुळे तरी माझे खरे माना. 12मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, मी जी कृत्ये करतो, ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील, आणि त्यांपेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो. 13पुत्राच्या ठायी पित्याचा गौरव व्हावा म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. 14तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन.

पवित्र आत्मा मिळण्याबद्दल वचन

15माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. 16मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हांला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल; अशासाठी की, त्याने तुमच्याबरोबर सदासर्वदा राहावे. 17जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही; तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्याबरोबर राहतो व तो तुमच्यामध्ये वस्ती करील. 18मी तुम्हांला अनाथ असे सोडणार नाही, मी तुमच्याकडे येईन. 19आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही; पण तुम्ही पाहाल; मी जिवंत आहे म्हणून तुम्हीही जिवंत राहाल. 20त्या दिवशी तुम्हांला समजेल की, मी आपल्या पित्यामध्ये आहे, व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुमच्यामध्ये आहे. 21ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे; आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील; मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वत: त्याला प्रकट होईन.” 22यहूदा (इस्कर्योत नव्हे) त्याला म्हणाला, “प्रभूजी, असे काय झाले की आपण स्वत: आम्हांला प्रकट व्हाल आणि जगाला प्रकट होणार नाही?” 23येशूने त्याला उत्तर दिले, “ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. 24ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळत नाही; जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे, तर ज्या पित्याने मला पाठवले त्याचे आहे. 25मी तुमच्याजवळ राहत असताना तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. 26तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हांला सर्वकाही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हांला आठवण करून देईल. 27मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो; मी आपली शांती तुम्हांला देतो; जसे जग देते तसे मी तुम्हांला देत नाही. तुमचे अंत:करण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. 28‘मी जातो आणि तुमच्याकडे येईन,’ असे जे मी तुम्हांला सांगितले ते तुम्ही ऐकले आहे. माझ्यावर तुमची प्रीती असती तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हांला आनंद वाटला असता; कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे. 29ते होईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा, म्हणून ते होण्यापूर्वी आता मी तुम्हांला सांगितले आहे. 30ह्यापुढे मी तुमच्याबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिकारी येतो; तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही; 31परंतु मी पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे करतो, हे जगाने ओळखावे म्हणून असे होते. उठा, आपण येथून जाऊ.



द्राक्षवेल आणि फाटे

1मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. 2माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो; आणि फळ देणार्‍या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. 3जे वचन मी तुम्हांला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. 4तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्यावाचून त्याला आपल्याआपण फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हांलाही देता येणार नाही. 5मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात; जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हांला काही करता येत नाही. 6कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो; आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. 7तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुमच्यामध्ये राहिली तर जे काही तुम्हांला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हांला प्राप्त होईल. 8तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचा गौरव होतो; आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. 9जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुमच्यावर प्रीती केली आहे; तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. 10जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. 11माझा आनंद तुमच्यामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. 12जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे. 13आपल्या मित्रांकरता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. 14मी तुम्हांला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. 15मी आतापासून तुम्हांला दास म्हणत नाही; कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते; परंतु मी तुम्हांला मित्र म्हटले आहे; कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हांला कळवले आहे. 16तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हांला निवडले व तुम्हांला नेमले आहे; ह्यात हेतू हा की, तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हांला द्यावे. 17तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी म्हणून मी तुम्हांला ह्या आज्ञा करतो.



येशूची प्रार्थना

1ह्या गोष्टी बोलल्यावर येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, “हे माझ्या पित्या, वेळ आली आहे; पुत्राने तुझा गौरव करावा म्हणून तू आपल्या पुत्राचा गौरव कर; 2कारण जे तू त्याला दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे म्हणून तू मनुष्यमात्रावर त्याला अधिकार दिला आहेस. 3सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. 4जे काम तू मला करायला दिलेस ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझा गौरव केला आहे. 5तर आता हे माझ्या पित्या, जग होण्यापूर्वी जो माझा गौरव तुझ्याजवळ होता त्याच्या योगे तू आपणाजवळ माझा गौरव कर. 6जे लोक तू मला जगातून दिलेस त्यांना मी तुझे नाव प्रकट केले; ते तुझे होते आणि तू ते मला दिलेस; आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे. 7आता त्यांना समजले आहे की, जे काही तू मला दिले आहेस ते सर्व तुझ्यापासून आहे. 8कारण जी वचने तू मला दिलीस ती मी त्यांना दिली आहेत; ती त्यांनी स्वीकारली; मी तुझ्यापासून आलो हे त्यांनी खरोखर ओळखले आणि तू मला पाठवलेस असा त्यांनी विश्वास ठेवला. 9त्यांच्यासाठी मी विनंती करतो; मी जगासाठी विनंती करत नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी; कारण ते तुझे आहेत. 10जे माझे ते सर्व तुझे आहे, आणि जे तुझे ते माझे आहे, आणि त्यांच्या ठायी माझा गौरव झाला आहे. 11ह्यापुढे मी जगात नाही, पण ते जगात आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र पित्या, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख, ह्यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे. 12जोपर्यंत मी जगात त्यांच्याबरोबर होतो तोपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या नावात मी त्यांना राखले; मी त्यांचा सांभाळ केला, आणि नाशाच्या पुत्राशिवाय त्यांच्यातून कोणाचा नाश झाला नाही; शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असे झाले. 13पण आता मी तुझ्याकडे येत आहे; आणि माझा आनंद त्यांच्या ठायी परिपूर्ण व्हावा म्हणून मी जगात ह्या गोष्टी बोलतो. 14मी त्यांना तुझे वचन दिले आहे; जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. 15तू त्यांना जगातून काढून घ्यावेस अशी विनंती मी करत नाही, तर तू त्यांना वाइटापासून राखावे अशी विनंती करतो. 16जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. 17तू त्यांना सत्यात समर्पित कर; तुझे वचन हेच सत्य आहे. 18जसे तू मला जगात पाठवलेस तसे मीही त्यांना जगात पाठवले, 19आणि त्यांनीही सत्यात समर्पित व्हावे म्हणून मी त्यांच्याकरता स्वतःला समर्पित करतो. 20मी केवळ त्यांच्यासाठी नाही, तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करतो, 21ह्यासाठी की, त्या सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या पित्या, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्या-माझ्यामध्ये [एक] व्हावे, कारण तू मला पाठवलेस असा विश्वास जगाने धरावा. 22तू जो गौरव मला दिला आहेस तो मी त्यांना दिला आहे, ह्यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे; 23म्हणजे मी त्यांच्यामध्ये व तू माझ्यामध्ये; ह्यासाठी की, त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की, तू मला पाठवलेस आणि जशी तू माझ्यावर प्रीती केलीस तशी त्यांच्यावरही प्रीती केलीस. 24हे माझ्या पित्या, माझी अशी इच्छा आहे की, तू जे मला दिले आहेत त्यांनीही जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे; ह्यासाठी की, जो माझा गौरव तू मला दिला आहेस तो त्यांनी पाहावा; कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केलीस. 25हे न्यायसंपन्न पित्या, जगाने तुला ओळखले नाही, पण मी तुला ओळखले आहे आणि तू मला पाठवलेस असे त्यांनी ओळखले आहे. 26मी तुझे नाव त्यांना कळवले आहे आणि कळवीन; ह्यासाठी की, जी प्रीती तू माझ्यावर केलीस ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे.”



येशूला वधस्तंभावर खिळणे

28ह्यानंतर, आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून, ‘मला तहान लागली आहे,’ असे म्हटले. 29तेथे आंब भरून ठेवलेले एक भांडे होते; म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज एजोब झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला. 30येशूने आंब घेतल्यानंतर, “पूर्ण झाले आहे,” असे म्हटले; आणि मस्तक लववून आपला आत्मा समर्पण केला. 31तो तयारीचा दिवस होता, म्हणून शब्बाथ दिवशी शरीरे वधस्तंभावर राहू नयेत (कारण तो शब्बाथ मोठा दिवस होता), म्हणून त्यांचे पाय मोडावेत आणि त्यांना घेऊन जावे अशी यहूद्यांनी पिलाताला विनंती केली. 32मग शिपायांनी येऊन त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेल्या पहिल्याचे व दुसर्‍याचे पाय मोडले; 33परंतु येशूजवळ आल्यावर तो मरून गेला आहे असे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत. 34तरी शिपायांतील एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला; आणि लगेच रक्त व पाणी बाहेर निघाले. 35ज्याने हे पाहिले त्याने साक्ष दिली आहे, त्याची साक्ष खरी आहे व आपण खरे बोलतो हे त्याला ठाऊक आहे, ह्यासाठी की, तुम्हीही विश्वास ठेवावा. 36“त्याचे हाड मोडणार नाही” हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून ह्या गोष्टी घडल्या. 37शिवाय दुसर्‍याही शास्त्रलेखात असे म्हटले आहे की, “ज्याला त्यांनी विंधिले त्याच्याकडे ते पाहतील.”



येशूचे प्रेषितांना दर्शन

19त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहूद्यांच्या भीतीमुळे बंद असता, येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, “तुम्हांला शांती असो.” 20असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यांना दाखवली; तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. 21येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हांला पाठवतो.” 22असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि त्यांना म्हटले, “पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. 23ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे; आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहेत.”